ऑगस्ट २०२६ पालकनीती
पालकनीती

पालकत्वाला वाहिलेले मासिक

ऑगस्ट २०२६

ऑगस्ट अंक PDF

लेख १ / ४

एन्टायटल्ड – डिस्-रिस्पेक्टफुल – डिस्ट्रॅक्टेड (Entitled – Disrespectful – Distracted) की अवेअर – अ‍ॅसर्टिव्ह – एंगेज्ड (Aware – Assertive- Engaged)

८ मिनिटं वाचन

प्रस्तुत लेख ‘जेन झी’बद्दल असल्याने त्यांच्यासाठी वापरण्यात येणारी विशेषणे लेखात तशीच्या तशी ठेवतो आहोत. लेख वाचताना त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ वाचकांना उलगडत जाईल – संपादक.

१. एन्टायटल्ड – ह्यांना प्रत्येक गोष्ट खूप सहज मिळाली आहे. त्यामुळे आपल्याला हवी ती गोष्ट मिळायलाच हवी अशी अरेरावी ह्यांच्या वागण्या-बोलण्यात डोकावते. त्यातून एक घातक वृत्ती तयार झाली आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करायची ह्या मुलांना सवयच नाही अजिबात!

२. डिस्-रिस्पेक्टफुल – दुसरा माणूस आपल्यापेक्षा शिक्षणाने, वयाने, ज्ञानाने, काही नाही तर निदान अनुभवाने मोठा आहे ह्याची तरी जाणीव ठेवावी, आदर ठेवावा. उद्धटपणे, उलट बोलू नये. निदान दिलेली वेळ पाळावी. एखादी गोष्ट करतो म्हटले, तर ती करावी. काम पूर्ण करायला जमत नसेल, तर निदान तसे सांगावे तरी. काहीच नाही. अजिबातच ‘रिलायेबल’ नाही ही पिढी.

३. डिस्ट्रॅक्टेड – सतत मोबाईलमध्ये घुसलेले असतात. सतत ‘स्क्रोलिंग’. एका गोष्टीवर लक्ष केंद्रितच करू शकत नाहीत. काय घंटा चांगले काम करणार हे. स्वतःच्या भवतालाशी असलेली नाळच तोडली गेलीये. कशाची काहीही पडलेली नाहीये. ‘ब्रेनरॉट’ होणार आहे अख्ख्या पिढीचे.

ही आहेत माझ्यासारख्या ‘ओल्ड मिलेनियल’ लोकांची ‘जेन झी’ पिढीविषयी असलेली प्रातिनिधिक / वानगीदाखल काही मते. अनुभवाधारित. त्यामुळे ती पूर्णपणे चुकीची आहेत असे म्हणता येत नाही. मला स्वतःलाही ती चुकीची वाटतच नाहीत. खरे तर, मला ती मान्य आहेत.

मी काही कुणाचा पालक नाही. पण एक कथा-पटकथा लेखक आणि सिनेमा-शिक्षक म्हणून गेल्या १० वर्षांपासून नवीन पिढीतल्या भरपूर मुला-मुलींशी – शहरी-ग्रामीण दोन्हीही – माझा पुरेसा संपर्क आहे, त्यांचा अनुभव आहे. शिवाय, कुटुंब-मित्रपरिवारातली नवीन पिढी आहेच. त्यातल्या बहुतांश पोरांशी माझी छान मैत्री आहे. पण तरीसुद्धा ढोबळ मानाने त्या पिढीचा मलाही असाच काहीसा अनुभव आहे. सिनेमा-नाटक-सामाजिक कार्य-तत्त्वज्ञान-मानवशास्त्र (humanities) ह्या विषयांशी निगडीत असलेल्या मुलांमध्ये आजूबाजूच्या भवतालाविषयी बऱ्यापैकी जागरूकता असते. पण बाकी मुलांच्या बाबतीत सगळा आनंदी-आनंद आहे असेच मलाही वाटायचे आणि त्यात बरेच तथ्यदेखील आहे असे मला अजूनही वाटते. पण ह्याच जेन झी च्या नेतृत्व आणि प्रचंड सक्रिय सहभागामुळे गेल्या ५० दिवसांत जे देशव्यापी विद्यार्थी-आंदोलन उभे राहिले आणि आपल्या देशातल्या जवळपास मृतवत लोकशाहीला नवसंजीवनी देण्याचे काम झाले, त्याने इतरांप्रमाणे मलाही ह्या पिढीविषयी नव्याने विचार करण्यास भाग पाडले. आणि असे वाटले, की ह्या पिढीची म्हणून जी वैशिष्ट्ये आहेत, ज्याकडे बहुतेक वेळेला आपण अवगुण म्हणून पाहिले, तीच वैशिष्ट्ये, तेच अवगुण ह्या आंदोलनात कामी आले कदाचित…

एन्टायटल्ड – अवेअर

मी अनुभवलेला एक प्रसंग –

एफटीआयआयद्वारे तेलंगणामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसांची पटकथा लेखनाची एक कार्यशाळा आयोजित केली गेली होती. ती घ्यायला माझेच एक शिक्षक तिथे गेले होते. पण त्यांचे त्या मुलांशी काही केल्या जमेना. कार्यशाळा पटकथा लेखनाची होती, पण मुलांना लेखनामध्ये बिलकुल रस नव्हता. त्यांनी शिक्षकांना सरळ तसे सांगितलेदेखील. शिक्षक गोंधळले. त्यांच्या तब्येतीच्याही काही तक्रारी असल्यामुळे ती कार्यशाळा त्यांनी माझ्या हाती सुपूर्त केली. मी तिथे गेल्यावर त्या मुलांनी मला सरळ सांगितले, “सर, आम्हाला फिल्म लिहायची नाहीये; बनवायची आहे.” मी तर पटकथालेखन कार्यशाळेच्या तयारीने गेलो होतो. पण माझ्या लक्षात आले, की या मुलांना फिल्म बनवायचीच आहे. मग मी त्यांना तसे पूर्ण स्वातंत्र्य दिले. हवी तशी आणि हवी तेवढीच मदत केली आणि दहा दिवसांत त्या मुलांनी मोबाईलद्वारे चार शॉर्ट फिल्म्स बनवल्यादेखील. मी अवाक झालो होतो. विचार केला, की माझ्या पिढीतल्या मुलांची शिक्षकांना असे काही बोलण्याची हिंमतही झाली नसती कदाचित. त्यांनी गुपचूप, मान खाली घालून दहा दिवस रेटले असते. पण या मुलांनी बेधडक, निर्भयपणे ते सांगितले, कारण त्यांच्यात तो आत्मविश्वास होता. तो आला कुठून, तर त्यांच्या हातातल्या मोबाईलमधून. ते सतत रील्स बघत होते, यूट्यूब बघत होते, पॉडकास्ट बघत होते. त्यांना एडिटिंगची टूल्सपण येत होती. आपल्याला काय करायचेय हे त्यांना माहीत होते. मग चुकत, शिकत आणि थोडी माझी मदत घेत त्यांनी ते केलेदेखील.

ज्याला आपण एन्टायटलमेन्ट म्हणतो, त्याची दुसरी बाजू अशी आहे, की आपण जी मागणी करतो आहोत, ती योग्य असेल, तर ती बेधडकपणे व्यक्त करण्यात या मुलांना कसलाही कमीपणा किंवा भीती वाटत नाही. ह्या पिढीचा हाच अवगुण (!?) आताच्या विद्यार्थी-आंदोलनातही खूप कामी आला असे मला वाटते. त्यांना माहिती होते, की आपण करत असलेली शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी नैतिकदृष्ट्या (‘एथिकली’ आणि ‘मॉरली’) पूर्णपणे योग्य आहे. त्यामुळे बदनामी, पोलिसांचा लाठी-चार्ज, टिअर गॅस किंवा इतर कोणत्याही दडपशाहीमुळे त्यांचा आत्मविश्वास ढळला नाही. कारण आपल्या बाबतीत काही चुकीचे घडले, तर आपण तेदेखील जगापर्यंत सहज पोहचवू शकतो हेही त्यांना ठाऊक होते. त्यामुळे ती एन्टायटलमेन्ट न राहता आपल्या हक्कांविषयीची जाणीव बनली (awareness of your own rights).

डिस्-रिस्पेक्टफुल – अ‍ॅसर्टिव्ह

माझ्याच अनुभवातला आणखी एक प्रसंग; एफटीआयआयमध्ये पूर्णवेळ शिकवत असतानाचा.

एकदा मी वर्गात दोन-तीन विद्यार्थ्यांना काही काम देत होतो. तेवढ्यात दुसरा एक विद्यार्थी अचानक मला म्हणाला, “सर, तुम्ही नेहमी त्यांना ‘फेवर’ करता. कारण ते तुमचे ‘फेव्हरेट स्टुडंट्स’ आहेत. ते हुशार आहेत, म्हणून तुम्ही त्यांनाच सारखे पुढे करता.”

मी एकदम चपापलो. थोडा रागही आला. पण अर्धा मिनिट विचार केल्यावर माझ्या लक्षात आले, की तो जे बोलतोय त्यात काही खोटे नाही. मी सरळ त्याची माफी मागितली आणि म्हणालो, “ठीक आहे. जे गट पाडायचे आहेत किंवा जी कामं आहेत, ती आपण सगळ्यांमध्ये विभागून करूया.”

या पिढीचा हासुद्धा एक महत्त्वाचा गुण आहे असे मला वाटते. समोरची व्यक्ती आपली शिक्षक आहे, वयाने आणि अनुभवाने थोडी मोठी आहे, केवळ म्हणून ती सांगेल त्याला होकार द्यायचा, असे ते करत नाहीत. हे त्यांचे गुणवैशिष्ट्य मला वारंवार, विशेषतः शिकवताना जाणवते. माझ्या पिढीत, शिक्षक वर्गात आले, की मनात आपोआप यायचे, ‘अरे, शिक्षक आहेत. त्यांना आदर दिला पाहिजे किंवा खरे म्हणजे, झक मारत द्यायलाच लागेल.’ पण आत्ताची पिढी अशी नाही. निदान मला तसा अनुभव येत नाही. सुरुवातीचा काही काळ तेच आपल्याला ‘जज’ करत असतात, असे मला वाटते. ‘या व्यक्तीकडून आपल्याला खरंच काही शिकायला मिळणार आहे का?’ हा प्रश्न ते स्वतःला विचारत असतात. आणि त्यांना वाटले की ‘हो, या व्यक्तीकडे आपल्याला देण्यासारखे काही आहे’, तरच ते आदर देतात. मग एकदा त्यांना हेही जाणवले, की ही व्यक्ती आपल्याशी आपल्या पातळीवर येऊन, मैत्रीपूर्ण पद्धतीने बोलते आहे, आपल्याला कमी लेखत नाहीये, आणि खरेच तिच्याकडे देण्यासारखे काही आहे – तर मग आदर हा वेगळा मुद्दा राहतच नाही. कारण तिथे मैत्री निर्माण होते. आणि मग तुम्हाला भरपूर प्रेमही मिळते, आदरही मिळतो. तुमचे काही चुकत असेल, किंवा त्यांना काही पटले नसेल, तर ही मुले ते बिनधास्तपणे सांगतात. पण त्याच वेळी त्यांना तुमच्याकडून जे काही मिळेल, त्याविषयी ती भरभरून व्यक्तदेखील होतात. ईमेल लिहितात, ‘डीएम’ करतात, इन्स्टा स्टोरीज, पोस्ट टाकतात.

केवळ एखादी व्यक्ती वयाने, अनुभवाने किंवा वरकरणी ज्ञानाने मोठी आहे, म्हणून तिला आपोआप आदर द्यायचा नाही हा ह्या पिढीचा गुण या आंदोलनात खूप कामी आला, असे मला वाटते. सरकार आहे, मंत्री आहेत, ते आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, अधिकाराने किंवा पदाने मोठे आहेत म्हणून ते जे बोलतील त्याला होकार द्यायचा, ते मान्य करायचे, ही सवय देशातल्या बहुसंख्य लोकांना लागलेली आहे. ती या मुलांनी धुडकावून लावली. आणि त्याचे मला प्रचंड, म्हणजे प्रचंडच कौतुक वाटते. कारण मुळात मलाच असे वाटते, की कुठल्याही व्यक्तीला केवळ तिच्या वयामुळे किंवा पदामुळे आदर फुकट मिळू नये. वय कितीही असो, आदर हा नेहमी कमावला(च) गेला (earned) पाहिजे. त्यामुळे या पिढीच्या बेधडक वृत्तीला मला डिस्-रिस्पेक्टफुल असे लेबल द्यावेसे वाटत नाही. उलट, अ‍ॅसर्टिव्ह म्हणावेसे वाटते.

डिस्ट्रॅक्टेड – एंगेज्ड

आता माझ्या मित्राच्या आयुष्यातला एक प्रसंग –

माझा मित्र दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या बेछूट अत्याचाराचे व्हिडिओ पाहत होता. त्याची तेरा वर्षांची मुलगी शाळेतून आली. तीही ते व्हिडिओ पाहू लागली. व्हिडिओ पाहिल्यावर ती लगेच म्हणाली, “हे सरकार किती क्रूर आहे!” माझ्या मित्राला अर्थातच बरे वाटले, कारण त्याच्या विचारांशी तिने सहमती दर्शवली.

दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा मित्र पुन्हा अत्याचाराचेच व्हिडिओ पाहत होता. तेव्हा अचानक ती त्याला म्हणाली, “आता मला विरुद्ध बाजूचे व्हिडिओ दाखव.” माझा मित्र एकदम चपापला. कारण त्याच्या सोशल मीडिया ‘अल्गोरिदम’मुळे त्याला केवळ आंदोलनकर्त्यांच्या दृष्टिकोनातूनच व्हिडिओ दिसत होते.

ज्या पिढीला आपण डिस्ट्रॅक्टेड म्हणतो – सतत सोशल मीडियावर असणारी, मोबाईलमध्ये घुसलेली – ती पिढी त्यांच्या ह्याच अवगुणामुळे संपूर्ण जगाशी सतत एंगेज्ड देखील आहे. त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध असल्यामुळे कोणतीही एक बाजू ते अंतिम सत्य म्हणून लगेच स्वीकारत नाहीत. कारण त्याच्या विरुद्ध बाजूचाही दृष्टिकोन कुठेतरी उपलब्ध असेल हे त्यांना माहीत असते आणि तो शोधणेही त्यांच्या दृष्टीने फार अवघड नसते. ऑस्करच्या मंचावरून ट्रम्पला उघडपणे विरोध करणारी किंवा टीका करणारी माणसे जशी त्यांना सहज यूट्यूबवर दिसतात, तशीच ट्रम्पच्या आवाहनानंतर कॅपिटॉलवर हल्ला करणारी माणसेही सहज दिसतात.

त्यांचा हादेखील गुण ह्या आंदोलनात भरपूर कामी आला असे मला वाटते. कारण त्यांना त्यांच्या विरोधातली बाजू, कथने (narratives) देखील चांगल्यापैकी माहिती होती. म्हणूनच त्याचे खंडनसुद्धा ते ताकदीने करू शकत होते. ह्या ‘यंग’ पोरांची रील्स आपण पाहिली, तर आपल्याला ते सहज दिसून येते.

अर्थात, म्हणून ह्या पिढीचे सगळे दोष झाकले जातील, त्या दोषांमुळे त्यांचे काही नुकसान होणार नाही, ही पिढी संपूर्ण क्रांती घडवून आणेल… असे काही मला म्हणायचे नाहीये. मला असेही म्हणायचे नाही, की सरसकट सगळीच जेन झी ही अवेअर – अ‍ॅसर्टिव्ह – एंगेज्ड वगैरे आहे. पण एवढे निश्चित, की ह्या आंदोलनाने जेन झी मधल्या, निदान त्यांच्यातल्या एका समूहामधल्या, गुणांचे प्रात्यक्षिक देशाला घडवले. स्वतःच्या हक्कांची जाणीव असणे, एखाद्याला फुकटचा आदर न देता त्या व्यक्तीकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा करणे आणि ते मिळाले तरच त्याला आदर देणे, संपूर्ण जगाशी जोडलेले असणे, कोणतीही गोष्ट अंतिम सत्य म्हणून लगेच न स्वीकारता, तिच्या सगळ्या बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे गुण प्रकर्षाने दिसून आले. सगळ्या पिढ्यांनी ते आत्मसात केले, तर आपली लोकशाही नक्कीच अधिक सुदृढ आणि जिवंत होईल, असे मला वाटते.

म्हणून हा लेखनप्रपंच.

आणि जाता जाता, या जेन झी च्या तथाकथित असभ्य भाषेविषयी.

ही ‘मीम्स’ आणि ‘रील्स’वर वाढलेली पिढी आहे. त्यांनी जे म्हटले, पोस्टर्सवर लिहिले किंवा दाखवले, ते प्रामुख्याने व्यंगात्मक होते. व्यंगात्मक भाषा / व्यंगचित्रे ही नेहमीच थोडी असभ्यतेकडे झुकणारी असतात. आपल्या आधीच्या पिढीतील लोकांनी ज्यांच्या व्याख्यानांना प्रचंड गर्दी केली, ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ म्हणून ज्यांना डोक्यावर घेतले, अशा आचार्य अत्र्यांची भाषाही अशीच व्यंगात्मक आणि त्यामुळे थोडीशी असभ्यतेकडे झुकणारी असायची. पण तेव्हा व्यंगात्मक भाषेकडे लक्ष देण्यापेक्षा त्यामागच्या मथितार्थाकडे लक्ष द्यायचे असते, एवढे कळण्याइतपत समाज सुजाण होता कदाचित.

या आंदोलनाबद्दल, ‘ज्या विद्यार्थ्यांनी निदर्शनात भाग घेतला आहे, त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’ असे उघड उघड धमकीवजा आणि द्वेषपूर्ण विधान एका केंद्रीय मंत्र्यांनी केल्याचे आपण ऐकले वाचले असेल. त्याकडे लक्ष देणे आणि त्याबद्दल सत्तेला प्रश्न विचारणे गरजेचे आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या व्यंगात्मक आणि म्हणून काहीशा असभ्य (ती भाषा कायद्याच्या दृष्टीने अश्लील नाही) भाषेकडे लक्ष देत राहिलो, तर दडपशाही करणाऱ्या व्यवस्थेला आपण प्रोत्साहनच देऊ, एवढी जाणीव असू द्यावी.

लेख २ / ४

मानापमान

६ मिनिटं वाचन

आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे, कधी आपल्या हावभावांमुळे, तर कधी एखाद्या कृतीमुळे समोरच्या माणसाचा अपमान होतो. विविध व्यक्ती कमी-अधिक प्रमाणात अपमानित होतात. हे आपल्या स्वतःच्या बाबतीतही घडतं! आपल्याही मनात कधीकधी समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे, कृतीमुळे, तिच्याकडून मिळालेल्या वागणुकीमुळे अपमानित झाल्याची भावना निर्माण होते. असं नेमकं कधी होतं? प्रत्येक वेळी अपमान समोरच्याच्या कृतीत / बोलण्यातच असतो का? की तो आपल्याच विचारांनी काढलेला निष्कर्ष असतो? नेमकं काय मिळालं की मला सन्मान मिळाल्याची जाणीव होते आणि काय हरवल्याच्या भीतीनं माझा अपमान होतो?

एकच वाक्य एका व्यक्तीला अस्वस्थ करतं, तर दुसऱ्याला त्यानं काहीच फरक पडत नाही. आपल्या मानापमानाच्या कल्पना आपल्या आत्मसन्मानाशी खूप जोडलेल्या असतात. समोरच्यानं भिरकावलेला अपमानाचा तुकडा मी माझा समजून झेलणार, की ‘माझा नाही’ असं ठामपणे म्हणून सोडून देणार हे मला स्वतःबद्दल काय आणि किती छान वाटतंय यावर अवलंबून असतं. मानसशास्त्रज्ञ जेनिफर क्रॉकर यांच्या मते प्रत्येकाचा आत्मसन्मान काही विशिष्ट ‘आधारस्तंभां’वर उभा असतो – कुणाचा बुद्धिमत्तेवर, कुणाचा दिसण्यावर, तर कुणाचा इतरांच्या मान्यतेवर.

ज्याचा आत्मसन्मान कर्तृत्वावर अवलंबून आहे, त्याला ‘तुला हे जमत नाही’ हे वाक्य खूप झोंबतं.

ज्याचा आत्मसन्मान इतरांच्या स्वीकृतीवर अवलंबून आहे, त्याला दुर्लक्षिलं जाणं किंवा वगळलं जाणं जास्त त्रासदायक वाटतं.

म्हणूनच अपमान समजून घेताना ‘काय बोललं गेलं’ इतकंच ‘कुणाच्या कोणत्या भावनिक आधारावर घाव बसला’ हे पाहणंही महत्त्वाचं ठरतं.

हे आत्मसन्मानाचे आधारस्तंभ कसे तयार होतात ते बघूयात. ज्या व्यक्तीला लहानपणी बुद्धिमत्तेवरून कौतुक आणि स्वीकार मिळालेला असतो, तिच्या आत्मसन्मानाचा आधारस्तंभ बुद्धिमत्ता नसतो. कुणी मूर्ख म्हणालं, तर तिला तो अपमान स्वतःवर न घेता सहज सोडून देता येतो.

उलट समजा एखाद्याला लहानपणी पालकांनी मूर्ख, बेअक्कल, बावळट अशा शिव्याशापांनी हिणवलेलं असेल. अशा वेळी त्या लहान बाळाकडे एकच मार्ग असतो – ‘माझे पालक म्हणताहेत त्याअर्थी मी मूर्खच असणार!’ असं खूप खोलपर्यंत मान्य करून टाकणं. पण पालकांच्या आणि समाजाच्या पसंतीस उतरण्यासाठी ‘आपण बुद्धिमान आहोत’ हे वरवर दाखवण्याचे आटोकाट प्रयत्न चालू असतात. ही व्यक्ती ‘मी बावळट आहे’ हे लपवण्यात खूप शक्ती खर्च करते. म्हणजे माझ्या आत्मसन्मानाचं लग्न बुद्धिमत्तेशी लावलं, की तो झाला आत्मसन्मानाचा आधारस्तंभ. पुढे प्रौढपणी समोरचा या व्यक्तीला ‘एवढं साधं कळत नाही, काय बावळट आहेस!’ असं म्हणाला, तरी ते खूप लागेल, अतिशय अपमानास्पद वाटेल. समोरची व्यक्ती जणू आपलं पितळ उघडं पाडतेय असं वाटेल.

‘शब्दांनी काय अंगाला छिद्र पडतात का?’ हे आपण अनेकदा कुणी तरी कुणाला तरी म्हटलेलं ऐकतो. पण अपमानाचे परिणाम शारीरिक दुखण्याइतकेच खरे आणि खोलवर असतात असं मानसशास्त्रीय संशोधन सांगतं. मेंदूतील ज्या भागात शारीरिक वेदना जाणवते, त्याच भागात – अँटीरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स – अपमानाच्या क्षणीही सक्रियता दिसते. म्हणजे ‘शब्द लागत नाहीत’ हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या तितकंसं खरं नाही. म्हणजे एखाद्याचा अपमान करणं हे त्या व्यक्तीला शारीरिक मारहाण न करता इजा करण्यासारखं आहे.

काही पालकांच्या प्रेमाच्या कल्पना चुकीच्या असतात, कधी पालकांकडे मुलांना द्यायला वेळच नसतो, काही पालक मुलांकडे ‘कमी महत्त्वाचे’ म्हणून लक्ष देत नाहीत, काही मुलांना आई नसते, काहींना बाबा नसतो, तर काहींना आईबाबा दोन्ही नसतात. अशी, विविध कारणांनी दुर्लक्षित असलेली मुलं ‘आपण वाईट असणार म्हणून कमी महत्त्वाचे आहोत’ अशी समजूत मनात खोलवर रुजवून घेतात. मोठं झाल्यावरही हा न्यूनगंड त्यांच्या मनात दबा धरून राहतो. त्याच वेळी ‘आपण किती महत्त्वाचे आहोत’ हे दाखवण्याचा प्रयत्न वरवर चालू असतो. ते महत्त्व मिळवण्यासाठी विविध युक्त्या योजल्या जातात. लहानांना पाया पडायला लावणं इथपासून ते समारंभांमध्ये प्रतीकात्मक सत्कार व भेटी घेणं, तशी अपेक्षा ठेवणं, आणि हे मिळालं नाही तर अपमान वाटून घेणं (पुन्हा तेच, ‘मी वाईट असणार’ हे लपवायचा प्रयत्न करून तेच पितळ उघडं पडल्याची भीती).

आता उत्क्रांतिशास्त्राच्या अंगानं अपमान समजून घेऊयात. माझा अपमान होतोय म्हणजे माझं आत्मसन्मानाचं गणितच काहीतरी गंडलंय असं प्रत्येक वेळी समजू नये! उत्क्रांतिशास्त्रानुसार प्रत्येक भावनेचं काहीतरी प्रयोजन असतं. अपमान या भावनेलापण प्रयोजन आहे. शाब्दिक अपमान ही शारीरिक हल्ला करायच्या आधीची पायरी असू शकते. मला दुखवणं हाच समोरच्याचा हेतू असू शकतो. मग मला ते ओळखता येईल का? ‘समोरची व्यक्ती माझी शत्रू आहे आणि मला धोका पोहोचवू शकते’. सावध! म्हणूनच अपमान हा प्रत्यक्ष वेदनेसारखाच जाणवतो.

उत्क्रांतिशास्त्रानुसारच, अनेक संस्कृतींमध्ये अपमान हे प्रत्यक्ष मारामारी न करता वर्चस्व सिद्ध करण्यासाठी वापरतात. या जीवशास्त्रीय प्रेरणेतूनही काही मंडळींना इतरांना अपमानित करून आपण श्रेष्ठ असल्याचा आनंद मिळतो.

मानसशास्त्रात पूर्वी असं मानलं जायचं, की कमी आत्मसन्मान असलेली माणसं अपमानाला हिंसकपणे प्रतिसाद देतात. रॉय बॉमायस्टर आणि सहकाऱ्यांच्या संशोधनातून असं समोर आलं, की जास्त पण अस्थिर आत्मसन्मान असलेली माणसं – विशेषतः आत्ममग्न (नार्सिसिस्टिक) प्रवृत्तीची माणसं – अपमान झाल्यावर सर्वाधिक आक्रमक होतात. त्यांच्या स्वतःबद्दलच्या फुगलेल्या प्रतिमांना आव्हान मिळाल्यासारखं होतं, तेव्हा ती प्रतिमा दुरुस्त करण्याऐवजी ते समोरच्यावर हल्ला करून आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.

याउलट, स्थिर आत्मसन्मान असलेली माणसं – मग आत्मसन्मान जास्त असो वा मध्यम – अपमानाचा धक्का बऱ्यापैकी पचवू शकतात.

अपमान नेहमी थेट शिवीगाळीच्या रूपात येत नाहीत, तर दैनंदिन वागण्यातील सूक्ष्म असभ्यतेतून – म्हणजे कामाच्या ठिकाणी किंवा समाजात घडणाऱ्या काही संदिग्ध प्रसंगांतून – येतात. म्हणजे थेट अपमान नाही, पण समोरच्याला जाणते-अजाणतेपणी कमी लेखणं वगैरे.

ह्याची काही उदाहरणं पाहू :

  • एखाद्याचं बोलणं मध्येच तोडणं आणि असं सतत होत राहणं.
  • खालच्या स्वरात, तुच्छतेनं बोलणं – ‘हे तुला समजेल अशा सोप्या भाषेत सांगतो.’
  • एखाद्याच्या कल्पनेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणं आणि तीच कल्पना दुसऱ्यानं मांडली, की कौतुक करणं.
  • कमी शिक्षित माणसाला तुच्छपणे अथवा कमी भावनेनं वागवणं.

अनेकदा अशा प्रसंगांचा हेतू जाणीवपूर्वक दुखावण्याचा नसतोही – समोरची व्यक्ती घाईत असते किंवा या वागण्याचे अमुक अमुक परिणाम होतील एवढा विचारही केलेला नसतो. पण संशोधन सांगतं, की परिणाम हेतूवर अवलंबून नसतो; समोरच्याला जे वाटतं, तेच खरं ठरतं. अशा प्रसंगांमुळे माणसाची कल्पकता, कामातली एकाग्रता आणि मदत करण्याची इच्छा घटते. आणि हा परिणाम फक्त अपमानित झालेल्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तो पाहणाऱ्यांपर्यंतही पसरतो. म्हणजे घरात एका व्यक्तीला वरील स्वरूपाची वागणूक मिळत असेल तर त्याचा परिणाम मुलांवरपण होतोच.

प्रत्येक माणूस एकंदर स्वतःच्या प्रतिष्ठेचं रक्षण करत असतो. त्यात एका कोणत्या गुणाला विशेष महत्त्व नसतं. म्हणजेच ‘एकूणात’ स्वप्रतिमेला कमीतकमी धक्का लागू देणं. अपमान पचवताना आपण स्वतःला आपल्या चांगल्या गुणांची / मूल्यांची आठवण करून दिली, तर अपमान पचवायला सोपा जातो.

अपमान ही केवळ शब्दांची देवाणघेवाण नाही; ती एक सामाजिक, मानसिक आणि जीवशास्त्रीय प्रक्रिया आहे. आपला आत्मसन्मान कशावर उभा आहे, तो किती स्थिर आहे आणि आपण त्या क्षणी किती असुरक्षित आहोत – या सगळ्यावर अपमानाची तीव्रता अवलंबून असते. हे समजून घेतलं, की अपमानाला सामोरं जाण्याचे स्वतःचे मार्ग आपण अधिक जाणीवपूर्वक निवडू शकतो आणि इतरांशी वागतानाही अधिक संवेदनशील राहू शकतो.

या सगळ्या विचारमंथनाचा पालकनीती म्हणून कसा बरं उपयोग होईल?

एक म्हणजे, ज्या घरात मूल असेल तिथे किमान वर उल्लेख केलेली सूक्ष्म असभ्य वागणूक टाळावी. मुलांना शिव्याशाप, दूषणं दॆऊच नयेत. अजाणतेपणी जरी मुलांना तुच्छ लेखलं गेलं असेल, तरीसुद्धा त्यांचा आत्मसन्मान कमी होतो. मुलांसमोर इतरांना असभ्य वागणूक दिली, तरीसुद्धा त्याचा त्यांच्या कल्पकतेवर, एकाग्रतेवर आणि भावनांकावर वाईट परिणाम होतो. दुसरं असं, की मुलांना ती आहेत तसा स्वीकार पालकांकडून मिळाला, तर त्यांचा आत्मसन्मान चुकीच्या कल्पनांच्या आधारस्तंभावर उभा राहणार नाही. एकदा मूल मोठं झालं, की बाहेरच्या जगात त्याला अपमानाच्या प्रसंगांना सामोरं जावंच लागणार आहे. पालक म्हणून आपल्या मुलांना तुम्ही जेवढं सहज प्रेम (नो कंडिशन्स अप्लाईड!) द्याल, तेवढी त्यांची स्वतःबद्दलची प्रतिमा चांगली असेल. मग इतरांनी सूचित केलेले अपमानास्पद इशारे ती स्वतःला लावून घेणार नाहीत.

पालकत्व म्हणजे मुलांना काय शिकवावं किंवा कशी वागणूक द्यावी एवढंच नसून तो एक स्वत:ला समजण्याचा प्रवास आहे. एखाद्या समुपदेशकाने जोपर्यंत स्वतःचे प्रश्न सोडवलेले नसतात, तोवर तो चांगला समुपदेशक होऊ शकत नाही. पालकांचा प्रवासही तसाच आहे. ज्या उणिवा, दुःख माझ्या पाल्याच्या वाटेला येऊ नयेत असं वाटत असेल, त्या सर्व बाबी मी आधी नीट समजून निस्तरण्याचं कौशल्य मिळवायला हवं.

संदर्भ

४. https://www.psychologytoday.com/us/blog/the-human-beast/201611/the-psychology-insults

लेख ३ / ४

पालकांना ‘कानसेन’ होण्यासाठी – ‘प्रकल्पवाटा’

४ मिनिटं वाचन

मनीषा आनंद क्षेमकल्याणी

बराच वेळ बाई विद्यार्थ्यांनी लिहिलेले कागद वाचत बसल्या होत्या. बाईंच्या हातातले हे कागद परीक्षेचे पेपर नाहीत हे एव्हाना बाईंची लेखन-मदतनीस असलेल्या सुरेखाच्या लक्षात आले होते. पण मग बाई बराच वेळच्या काय वाचताहेत, मधून मधून का हसताहेत, वाचताना त्यांचे डोळे का चमकताहेत हे मात्र सुरेखाला उमजत नव्हते आणि याची उत्सुकताही तिला स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी थोडे धाडस करून तिने बाईंना त्याबद्दल विचारलेच. तिच्या हातात कागद देत बाई उत्साहाने म्हणाल्या, “अग, हे बघ मुलांनी काय काय लिहिलेय… तूही वाच…” बाईंनी वर्गात मुलांना काही प्रकल्प दिले होते. त्यात मुलांनी लिहिलेला मजकूर वाचण्यात बाईंप्रमाणे तीही रमून गेली.

प्रकल्पाचे नाव : कविता सर्वेक्षण (कवितांबद्दलची समज वाढवण्यासाठी केलेले सर्वेक्षण)

मुलांनी प्रकल्पात केलेल्या काही नोंदी –

  • …कविता ही एक संवादाची भाषा आहे, जी बाणासारखी तीक्ष्ण आणि फुलपाखरासारखी स्वतंत्र आहे… तुम्हाला माझा प्रकल्प वाचण्यासाठी शुभेच्छा !
  • कवितेबद्दल सर्वेक्षण करताना ‘आवडलेली कविता’ या विषयावर एका काकांनी त्यांना कविता खूप आवडतात असं सांगितलं आणि ‘श्रावणमास’ ही संपूर्ण कविता आम्हाला म्हणून दाखवली; पण दुसरीकडे एका ताईने आम्हाला सर्व उत्तरे गूगलवरून सांगितली. तिला वाटले की आम्हाला हे कळणार नाही.

प्रकल्पाचे नाव : बालकुमार दिवाळी अंक

मुलांनी प्रकल्पात केलेल्या काही नोंदी –

  • जसे दिवाळीतले दिवे आपल्या घराला सजवतात, तसे दिवाळी अंक आपल्या मनाला सजवतात.
  • छोट्यांच्या दिवाळी अंकात सर्व चित्रे एकाच माणसाने काढल्याने शैली एकच आहे.
  • या दिवाळी अंकात छोट्या लेखकांना आणि चित्रकारांनाही संधी द्यायला हवी होती .
  • मराठीच्या तासाला रोजचा अभ्यास सोडून दिवाळी अंकासारखे काहीतरी भन्नाट प्रकल्प करायला अतिशय मजा आली. तास संपला की घाईघाईत ग्रंथालयात जायची एक वेगळीच ओढ जाणवली.

प्रकल्पाचे नाव : शब्दकोश

मुलांनी प्रकल्पात केलेल्या काही नोंदी –

  • शब्दकोश म्हणजे साठा.
  • शब्दकोश आणि व्याकरण हे भाषेचे दोन डोळे आहेत.
  • शब्दकोशात हवा तो शब्द सापडत नसताना होणारी तळमळ आणि तो विशिष्ट शब्द सापडल्यावर मिळणारी शांती याचा अनुभव अतुलनीय होता.
  • अर्थच काय शब्दांचे उच्चारही आम्हाला नीट जमत नव्हते. ‘आपले मराठी चांगले’ या अभिमानाला पोचे पडत होते .

सुरेखाने पुढची पानेही भराभर वाचून संपवली. हे सगळे मुलांनी अतिशय प्रामाणिकपणे लिहिले होते. तिचे मन मुलांबद्दलच्या कौतुकाने भरून गेले.

वाचकहो, तुम्हीही या कथेत रमलात ना? हा प्रसंग अगदीच काल्पनिक नाही; ‘प्रकल्पवाटा – एक प्रभावी शिक्षणपद्धती’ ह्या जयश्री काटीकरांच्या पुस्तकातला आहे. हे पुस्तक, ज्यांच्या घरात शाळेत जाणारी मुले आहेत त्या प्रत्येकासाठी आहे; मूल कोणत्याही माध्यमात आणि कुठल्याही बोर्डात शिकणारे असले तरीही!

१२-१५ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी- जयश्रीताईंनी अत्यंत कल्पक प्रकल्प तयार केले. नियोजनापासूनच त्यांनी विद्यार्थ्यांना त्यात सामील करून घेतले. त्यांनी ते कसे केले, मुलांचा उत्साह, त्यांची ऊर्जा, अवखळपणा, नितळ, निखळ, प्रामाणिक प्रयत्न, त्याचा परिपाक, त्याचे घरीदारी दिसणारे दृश्य-अदृश्य परिमाण याकरिता पालकांनी हे पुस्तक जरूर वाचावे.

हीच मुले घरी असताना हल्ली काय चित्र दिसते? त्यांचे वागणे, बोलणे, आकलन क्षमता, एकाग्रता, शिस्तीचा अभाव, मोबाईलचे व्यसन, सांगितलेले अजिबात न ऐकणे, हट्टीपणा, खाण्यातल्या आवडीनिवडी… यादी भलीमोठी आहे. यामागची म्हणून जी कारणे सांगितली जातात ती वरवरची आहेत. आईवडिलांना मुलांसाठी पुरेसा वेळ नसणे, आजीआजोबांना झेपत नसणे अशा कारणांच्या पलीकडे जाऊन मुलांच्या वागण्याचा विचार करायला हवा. त्यासाठी हे पुस्तक मदत करते. मुलांशी संवाद साधताना त्यांचे ‘ऐकणे’ महत्त्वाचे आहे हा गुरुमंत्र हे पुस्तक देते.

‘मुलांचे ऐकणे’ यावर ह्या संवेदनशील शिक्षिकेने शोधलेले मार्ग फक्त इतर शिक्षकांसाठी नाहीत, तर पालकांसाठीही आहेत. त्या अर्थाने ‘प्रकल्पवाटा’ हे पुस्तक पालक-बालक नात्यालाही झळाळी देईल.

शिक्षण घेणे म्हणजे अनुभवणे – अनुभव घेणे आणि अनुभव देणे, प्रश्न पडणे, त्या प्रश्नांचा शोध घेणे. त्यातून मुलांची विविध कौशल्ये विकसित होत जातात. ती टप्प्याटप्प्याने वयानुसार, वयाला साजेसे व्यक्त व्हायला शिकतात. त्यासाठी विचार करणे, भाषा शिकणे, आपले विचार मांडता येणे, इतरांचे ऐकून घेणे, छोटे छोटे निर्णय – जबाबदाऱ्या घेणे, त्या पार पाडणे, संघ भावना – गटकार्य, यश-अपयश हाताळणे, त्यातून पुन्हा पुढे जाणे… शिक्षक आणि पालकांना हेच तर अपेक्षित असते. शिक्षकांनी पाठ्यक्रमाला थोडी कृतीची जोड दिली, तर त्याचा परिमाण किती सुंदर होतो हे वर दिलेल्या प्रकल्पांतून आपल्याला ठसठशीतपणे दिसते.

या पुस्तकाची साधीसोपी भाषा, नियोजनाचे बाईंनी ठरवलेले टप्पे, त्यात मुलांनी घातलेली भर, त्यातून निर्माण झालेल्या नवनिर्मितीच्या शक्यता, मुलांनी केलेल्या कविता, व्यक्तिचित्रे, रचलेल्या छोट्या कथा, आपल्याच भावनांबद्दल लिहिलेले परिच्छेद… पुस्तकात हे सगळे वाचायला मिळते.

बाईंनी प्रकल्पासाठी निवडलेले विषयही तितकेच छान आहेत. पाऊस, कविता, दिवाळी अंक असे सहज फुलवता येणारे आणि मुलांना गुंतवणारे विषय त्यात आहेतच; शिवाय ‘शब्दकोश’, ‘समाज समजून घेताना’, ‘हा खेळ भावनांचा’… असे कठीण विषयही त्यांनी घेतले आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते.

मुलांना आपण गृहीत धरू नये. त्यांना जमेल का, झेपेल का, ती टाळतील – नाकारतील का, त्यांना आवडेल का, ती रमतील का, कंटाळतील का… इ. बद्दलची साचेबद्ध लेबले आधीच न लावता जयश्रीताईंनी मुलांचा सहभाग घेतला, त्यांच्या कल्पनांचे स्वागत केले, त्यांना स्वातंत्र्य दिले. ते सगळे जसेच्या तसे पालकांनी कॉपी केले, तरी ‘शालेय शिक्षण म्हणजे शाळेतले घर आणि घरातील शाळा’, असे बालक-पालकांचे आयुष्य आनंददायी होईल असा विश्वास हे पुस्तक देते. पुस्तक वाचताना पालकांनी पुस्तकात मधे मधे येणाऱ्या सुरेखा या पात्राच्या जागी स्वतःला ठेवावे! मुलांना केवळ शाळा-शिक्षक यांच्या हवाली न करता शिक्षक आणि पालक अशी समांतर चाके लयीत चालावीत.

‘पालक’ म्हणजे मुलाबाळांचे कर्तेधर्ते असे पिढ्यानुपिढ्या चालत आलेले गृहीतक. ‘कानसेन’ म्हणजे शास्त्रीय संगीतातले दर्दी ही व्याख्याही रूढ आहे. पालकांना आपल्या मुलांबरोबरचा संवाद वाढवायचा असेल, तर त्यांना ‘कर्तेधर्ते’पणाकडून ‘कानसेन’ होण्याच्या दिशेने प्रवास केला पाहिजे. श्रवण, अर्थात लक्षपूर्वक ऐकणे, हा संवादातला सर्वात महत्त्वाचा घटक! मुलांचे सगळे सगळे मनापासून ऐका, त्या संवादात सामील व्हा… थोडक्यात आपल्या मुलांचे ‘कानसेन’ व्हा!

पालकांची सगळी धडपड मुलांसाठीच असते; पण बरेचदा या भावनेला एक अपराध गंड चिकटलेला असतो. ‘प्रकल्पवाटा’ हा गंड घालवायला मदत करते. आपली मुले आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आहेत. आपणही त्यांच्या इतके लहान होऊन त्यांच्या आयुष्यात जाणे फार कठीण नाही. उलट ती आनंदयात्रा ठरावी.‘प्रकल्पवाटा’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहेच.

लेख ४ / ४

बाबाला नेहमीच कसा उशीर व्हायचा!

बाबा लहान होता तेव्हा – भाग १५

४ मिनिटं वाचन

लहान असताना इतर मुलांमुलींप्रमाणेच बाबाही शाळेत जायचा. बाकी सर्व मुलं शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच तिथे पोहोचायची; पण छोट्या बाबाला मात्र नेहमीच उशीर व्हायचा. कधीकधी तर त्याचा अख्खा पहिला तास बुडायचा. त्याच्या बाईंना ह्याचं खूपच आश्चर्य वाटायचं. त्या म्हणायच्या, की असा विद्यार्थी त्यांनी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.

मुख्याध्यापक म्हणायचे, “तो वेगळा आहे. असा विद्यार्थी इतर कोणत्याही शाळेत सापडायचा नाही. तो नेहमीच उशिरा येतो! त्याच्या पालकांचं म्हणणं आहे, की ते यावर काहीच करू शकत नाहीत. मी ह्याबद्दल त्यांच्याशी दोनदा बोललेलो आहे.”

हे खरंच होतं; छोट्या बाबाच्या पालकांना काहीही करता येणं अवघड होतं.

दररोज संध्याकाळी एकच एक प्रसंग घडायचा.

“गृहपाठ केलास का रे?” आजी विचारायची.

“थांब ना थोडंसं,” छोटा बाबा उत्तर द्यायचा.

“या क्षणी वाचन थांबव आणि लगेच गृहपाठ करायला घे!” आजोबा म्हणायचे.

“अजून एकच पान,” छोटा बाबा विनवणी करायचा.

तो ते पान पूर्ण करायचा आणि मग पुढचं पान वाचायला घ्यायचा. एखादं रंजक पुस्तक बाजूला ठेवून कंटाळवाणा गृहपाठ करणं त्याला काही केल्या जमत नसे.

“ते पुस्तक आत्ताच्या आत्ता खाली ठेव!”

“थोडं थांब ना.”

“ते पुस्तक आत्ताच्या आत्ता खाली ठेsssव!”

“थोडं थांबा ना, प्लीज.”

शेवटी, त्याच्या पालकांचा संयम सुटायचा आणि आजोबा किंवा आजीपैकी कोणीतरी छोट्या बाबाच्या हातातून ते पुस्तक हिसकावून घ्यायचे.

“तू अगदी आळशी आणि बिनकामाचा माणूस होशील मोठेपणी,” ते त्याला ओरडायचे.

छोट्या बाबाला याचं खूपच वाईट वाटायचं. तो ओरडायचा, रडायचा आणि आपलं पुस्तक परत मागायचा. पुस्तक परत मिळेपर्यंत आपण गृहपाठ करणारच नाही, असं म्हणायचा. आणि मग ती संध्याकाळ अशीच रेंगाळायची, वेळ असाच वाया जायचा. अखेरीस छोटा बाबा गृहपाठ करायला बसायचा, तोवर त्याला झोपच येऊन जायची. त्याचे आई-वडील त्याला उठवायचे. तो पुन्हा पेंगायचा. पण ते त्याला पुन्हापुन्हा उठवायचे. त्यामुळेच त्याचा घरचा अभ्यास सहसा अर्धवट झोपेतच कसाबसा पुरा व्हायचा. गृहपाठ पूर्ण होईपर्यंत खूप उशीर झालेला असायचा. आजी आणि आजोबा दोघेही खूप थकलेले असायचे.

सकाळची परिस्थिती अजूनच वेगळी असायची.

“उठ रे…!” आजी म्हणायची.

“एक मिनिट…,” छोटा बाबा पुटपुटायचा.

“उठ आता!” आजोबा ओरडायचे.

“एक मिनिट, प्लीज…”

“तुला शाळेला उशीर होईल!”

आदल्या रात्री उशिरा झोपल्यावर सकाळी लवकर उठणं किती कठीण असतं, हे सर्वांनाच माहीत आहे. सकाळीच तर सर्वात गोड स्वप्नं पडत असतात. विशेषतः शाळेत जायचं असतं तेव्हा! वेळ झपाट्यानं पुढे सरकायचा, आणि इकडे छोटा बाबा आळस देत जांभया द्यायचा, तोंड-हात धुवायचा, झोपेतच कसेबसे कपडे चढवायचा, नाश्ता करतानाही डुलक्या घ्यायचा. अखेरीस आपली वह्या-पुस्तकं गोळा करून घरातून बाहेर पडायचा आणि शाळेकडे धावत सुटायचा. वाटेत रस्त्यावरच्या घड्याळाकडे पाहताना त्याची छाती धडधडायची. धापा टाकत छोटा बाबा वर्गात प्रवेश करायचा, तेव्हा त्याचे शिक्षकही हसायचे.

“हा आला आपला झोपाळू!” ते म्हणायचे.

ते ऐकून त्याला खूप वाईट वाटायचं. हे इतक्यांदा घडलं होतं, की शाळेत भिंतीवरच्या वर्तमानपत्रात छोट्या बाबाचं एक व्यंगचित्र (कार्टून) लावलेलं होतं.

त्या चित्रात तो अंथरुणावर गाढ झोपलेला दाखवलेला होता आणि त्याचे आई-वडील त्याच्या अंगावर पाण्याच्या दोन मोठ्या बादल्या ओतत होते. एक मोठं गजराचं घड्याळ लहानग्या बाबाचा एक कान ओढत होतं, तर एक मुलगा त्याच्या दुसऱ्या कानात तुतारी फुंकत होता. त्या व्यंगचित्राखाली ’शाळेच्या दिवसाची अंगाई’ (A School day Lullaby) असं शीर्षक लिहिलेलं होतं. हे चित्र पाहिलं, की बाबाला राग यायचा, मात्र तरीही शाळेत तो नेहमी उशिराच पोहोचत असे. आपला गृहपाठ तो अगदी दिवस संपता संपता करायचा, त्यामुळे तो कधीच नीट होत नसे. आणि नेहमी उशिरा येत असल्यामुळे, शिक्षकांनी एखाद्या नवीन विषयाबद्दल दिलेली माहिती अनेकदा त्याच्याकडून हुकत असे. यामुळे वर्गातील इतर मुलं काय करत आहेत हे समजणं त्याला कठीण जाई. शिवाय तो नेहमीच घाईत असे, त्याला नेहमीच उशीर झालेला असे. नेहमी धावपळ, नाही तर गडबड. या सगळ्याच गोष्टी त्याच्यासाठी खूपच वाईट होत्या. आणि तरीही, तो नेहमीच उशिरा जात असे.

मला तुम्हाला असं सांगायला नक्कीच आवडलं असतं, की ‘एकदा शिक्षक त्याला ओरडले, इतर मुलांनी त्याची चेष्टा केली… मग एके दिवशी तो इतरांपेक्षा लवकर शाळेत आला आणि त्यानंतर त्याला कधीच उशीर झाला नाही’.

… पण मला खोटं बोलायचं नाहीये.

बाबा आयुष्यभर सगळीकडे उशिराच जात राहिला. लहान असताना तो शाळेत उशिरा पोहोचे. नंतर कॉलेजच्या तासांना उशीर. त्यानंतर कामावरही उशिरा पोहोचू लागला. लहान असताना त्याला शिक्षा झाली, ओरडा बसला आणि त्याची फजितीही झाली. मोठं झाल्यावर, या वाईट सवयीमुळे त्याला आयुष्यातील अनेक गोष्टींना मुकावं लागलं. तो नाटकांना उशिरा पोहोचला आणि त्याचा पहिला अंकच हुकला. पार्ट्यांना तो अनेकदा इतका उशिरा पोहोचे, की त्याला पुन्हा कधीच बोलावलं जात नसे. व्यावसायिक भेटीगाठींसाठी उशिरा पोहोचल्यामुळे ते सर्व कामच बिघडून जात असे. नवीन वर्षाच्या पार्टीला उशीर झाल्यामुळे अनेकदा निर्जन रस्त्यावर त्याला एकट्यानंच नवीन वर्षाचं स्वागत करावं लागलं आहे. अनेक लोक त्याची व्यर्थ वाट पाहत बसत. त्याच्या उशिरा येण्याबद्दलच्या गमतीशीर गोष्टी सांगायला त्याच्या मित्रांना खूप आवडतं.

आजही बाबाला हळू चालताच येत नाही. तो नेहमीच घाईत असतो, कारण त्याला उशिरा येण्याची सवयच झाली आहे. रात्री झोपेतही त्याला आपण एखाद्या भेटीसाठी उशिरा पोहोचलो आहोत, असं स्वप्न पडतं. झोपेत तो दचकतो आणि अस्वस्थ होऊन कण्हतो. कधीकधी त्याला स्वप्न पडतं, की तो पुन्हा लहान मूल झाला आहे आणि शाळेकडे धावतोय; स्वप्नातच तो घड्याळाकडे पाहतो, तर ते घड्याळ अजून लवकरचीच वेळ दाखवत असतं! सगळे त्याचं अभिनंदन करतात… मुख्याध्यापक त्याला फुलांचा गुच्छ देतात… शाळेच्या सभागृहात त्याचं छायाचित्र लावलं जातं… त्याच्यासाठी बँड वाजवला जातो…

ह्याच वेळी त्याला जाग येते. मग तो विचार करतो, की आपण पुन्हा लहान मूल झालोच, तर शाळेत कधीच उशिरा जाणार नाही.

सौजन्य : अरविंद गुप्ता टॉईज